दहिसरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यु

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच दहिसर पूर्व परिसरात एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला असून अज्ञात वाहनाने चिरडल्याने एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील चौकीजवळ दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्कूटरवरून जात असलेला एक व्यक्ती अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे टायर थेट त्या स्कूटरस्वाराच्या डोक्यावरून गेले. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

अपघातानंतर मृतदेह काही वेळ रस्त्यावरच पडून होता. मात्र, मदतीसाठी पुढे येण्याऐवजी काही जणांनी मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. काही तरुण ‘हेल्मेट वापरा’ असा संदेश देत व्हिडिओ आणि रिल्स तयार करत असल्याचा प्रकारही समोर आला. मृतदेह झाकण्यासाठी साधा कापड टाकण्याचीही तसदी कुणी घेतली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून अधिक तपास सुरू आहे.