२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग
शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात शुक्रवारी (ता. ३०) मोठा राजकीय भूकंप झाला. उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल २० नगरसेवकांच्या समर्थनाने मंजूर झाला. नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गादिया यांना उपनगराध्यक्षपद गमवावे लागले असून शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५५-१अ अन्वये ही विशेष सभा बोलावण्यात आली होती. नगरपरिषदेतील १८ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील अधिकृत नोटीस २६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षांना देण्यात आली होती.
सभात्याग करणाऱ्यांमध्ये मितेश प्रदीप गादिया, स्वप्नाली योगेश जामदार, सुनीता संतोष पोटे, चारुशिला गणेश कोळपकर, रवी ऊर्फ शाम मनोहर ढोबळे आणि अमोल दादासाहेब चव्हाण यांचा समावेश होता.
दरम्यान, सभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने २० नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी जाहीर केले. या निर्णयाने उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
सहा नगरसेवकांचा सभात्याग, २० जणांचे एकमताने समर्थन आणि उपनगराध्यक्षपदावर अविश्वासाचा शिक्का, या घडामोडींमुळे शिरूर नगरपरिषदेतील राजकीय संघर्ष आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. या अविश्वास ठरावानंतर नगरपरिषदेतील सत्तेची गणिते बदलणार का, आगामी काळात कोणाची राजकीय ताकद वाढणार आणि नव्या उपनगराध्यक्षपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार, याकडे आता संपूर्ण शिरूर शहराचे लक्ष लागले आहे.