वडिलांकडून मानसिक छळ! १८ वर्षीय मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डॉक्टर वडिलांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

क्राईम महाराष्ट्र

यवतमाळ: वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून एक हृदयद्रावक आणि समाजाला हादरवणारी घटना समोर आली असून, दीर्घकाळ मानसिक छळ करून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वडील असलेल्या डॉक्टराविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंगी मेघे पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0048/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108 अंतर्गत आरोपी डॉ. अरुण उत्तम वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

फिर्यादी डॉ. सौ. सुषमा अरुण वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कु. नक्षत्रा अरुण वानखेडे (वय 18) हिला वडील डॉ. अरुण वानखेडे यांनी सन 2021 पासून सातत्याने मानसिक छळ केला. विवाहबाह्य संबंधांबाबत प्रश्न विचारल्यामुळे नक्षत्राला अपमानास्पद शब्दांत हिणवण्यात येत होते. “तू माझी मुलगी नाहीस”, “तू पापाचे फळ आहेस”, “तू कलंक आहेस” अशा शब्दांनी तिला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुसाईड नोटमधील धक्कादायक खुलासे

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नक्षत्राच्या स्टडी रूममध्ये सापडलेल्या एका रजिस्टरमध्ये इंग्रजी व मराठी भाषेत लिहिलेला मजकूर आढळून आला. या नोंदींमध्ये वडिलांकडून मानसिक छळ होत असल्याचे तसेच काही गंभीर आरोप नमूद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर रजिस्टर पोलिसांकडे पुराव्यादाखल सादर करण्यात आले आहे.

आत्महत्येची घटना

तपासानुसार, दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.30 ते 06 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.00 या कालावधीत नक्षत्राने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांची तात्काळ कारवाई

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पीएसआय विशाल डोनेकर व पीएसआय सचिन कानडे यांनी उमरखेड (जि. यवतमाळ) येथून आरोपी डॉ. अरुण वानखेडे याला ताब्यात घेतले आहे.

समाजाला हादरवणारी घटना

उच्चशिक्षित डॉक्टर कुटुंबातील ही घटना अत्यंत धक्कादायक असून, मुलींवरील कौटुंबिक मानसिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.