मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

महाराष्ट्र

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना संबंधित क्लर्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट म्हणून राजू ढेरिंगे यांचा ५० हजारांची मागणी करतानाचा कथित व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणाची तीव्रता वाढली आहे.

ACB ची मंत्रालयात धडक; कागदपत्रे जप्त

तक्रारदार हरीराम घाणशी यांना सोबत घेऊन ACB पथकाने मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात सखोल चौकशी केली. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीदरम्यान विभागातील कामकाज पद्धती आणि फाईल हालचालींची तपासणी करण्यात आली.

खासगी सचिव कार्यमुक्त

या घडामोडींनंतर मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रकरणाचे धागेदोरे आणखी वरपर्यंत पोहोचणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

चौकशीदरम्यान मंत्रालयातील कथित लाचखोरीचे ‘रेटकार्ड’ समोर आल्याचा दावा आहे. फाईलवर एक ओळ टाकण्यासाठी ५० हजार रुपये, तर दोन ओळींसाठी १ लाख रुपये अशी मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम ACB करत आहे.

आधीही दोन मंत्र्यांचे राजीनामे

याआधी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराड कनेक्शन उघड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नाशिकमधील बोगस कागदपत्र प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद गेले. त्यामुळे महायुती सरकारमधील हा तिसरा मोठा धक्का ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर दबाव

अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले असताना मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्याने सरकारवर विरोधकांकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच दादांच्या राष्ट्रवादीची तिसरी ‘विकेट’ पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार झिरवळांना पाठबळ देणार की सरकार कठोर निर्णय घेणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ACB च्या पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.