तीन घरफोडीचे गुन्हे उघड, आरोपीविरुद्ध यापूर्वी १४ गुन्हे दाखल; १६ तोळे सोन्यासह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत घरफोडीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापुर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दिपक भिमराव दांडगे (वय २५, रा. घुग्री, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्यप्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपीकडून शिक्रापुर आणि शिरुर परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिक्रापुर व शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात झालेल्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच उपविभागातील पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांची बैठक घेऊन मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाने घरफोडीच्या घटनास्थळांचा, गुन्ह्यांच्या वेळेचा तसेच आरोपींच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. समान कार्यपद्धतीने घडलेल्या घटनांची माहिती एकत्रित करुन तांत्रिक विश्लेषणासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर घटनास्थळापासुन रस्त्यालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. उपलब्ध फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
दरम्यान, संबंधित घरफोडी करणारा आरोपी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कविठा येथे आपल्या बहिणीकडे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (LCB) आणि शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पथक अमरावती जिल्ह्यात रवाना झाले. कविठा परिसरातून दिपक दांडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने शिक्रापुर आणि शिरुर परिसरात घरफोडी करुन चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर शिक्रापुर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे आणि शिरुर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा अशा तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला. या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या तपासा दरम्यान आरोपीकडून चोरीचे सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २४ लाख ३० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, दांडगे हा सराईत घरफोडी करणारा आरोपी असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांत यापूर्वी एकूण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून तो सध्या शिक्रापूर पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. या कारवाईमुळे परिसरातील आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, पोलिस शिपाई सागर धुमाळ तसेच शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक फौजदार धनंजय थेऊरकर, पोहवा अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, पोलिस शिपाई मच्छिद्र निचित, नारायण वाळके, राम जाधव, भारत भोसले आणि पोलीस अंमलदार अस्मिता जोंधळे यांनी केली. पुढील तपास शिक्रापुर पोलीस करत आहेत.