Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात घरगुती वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

क्राईम

पतीकडून पत्नीच्या गळ्यावर वार करत छातीत चाकू भोकसला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील समर्थ नगर येथे एका इसमाने घरगुती वादातून घरात झोपलेल्या स्वतःच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत छातीमध्ये चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल मारुती मदने या व्यक्तीवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील समर्थ नगर येथे राहणाऱ्या अमोल मदने व अमृता मदने या दोघांमध्ये अमोल नियमित कंपनीत कामाला जात नसल्यामुळे गेली काही दिवसांपासून वारंवार घरगुती वाद होते. ३ दिवसांपूर्वी अमृता हिच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने अमृता गावी गेलेली होती. त्यानंतर नुकतीच घरी आली असता पती अमोल कामाला न जाता घरीच होता त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. त्यामुळे अमृता मुलांना घेऊन जवळील एका मंदिरात जाऊन बसली रात्री घरी आल्यानंतर तीने पुन्हा पतीला कामाला जाण्याबाबत समजावून सांगितले आणि सर्वजण झोपी गेले, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना अमोल उठून अमृता झोपेत असताना अमोलने जवळील चाकूने अमृता च्या गळ्यावर वार केले. तसेच अमृताला जीवे मारण्याच्या उद्देशाने अमृताच्या छातीत चाकू भोकसला. यावेळी अमृताने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक पळत आले त्यांनी अमृता हिला उपचारासाठी तातडीने जवळील रुग्णालयात हलवले. सदर घटनेत अमृता ही गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत अमृता अमोल मदने (वय ३१) रा. समर्थ नगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मुळ रा. म्हसवड ता. मान जि. सातारा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अमोल मारुती मदने (वय ३४) रा. समर्थ नगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मुळ रा. म्हसवड ता. मान जि. सातारा याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.