आठ ठिकाणी चोरीची कबुली; १७० किलो तांब्याच्या तारा जप्त, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
शिक्रापूर अक्षय टेमगिरे: शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील विद्युत रोहित्रांना (डीपी) लक्ष्य करून रात्रीच्या अंधारात त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी डीपी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून १७० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या असून, या मुद्देमालाची किंमत २ लाख २९ हजार ५०० रुपये आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना मोठा दणका बसला आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण ढुके व पोलीस अंमलदार लहानु बांगर हे अरणगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी अरणगाव व उरळगाव गावच्या शिवेवर विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत संशयितांचा शोध सुरू केला. त्याचवेळी विनानंबर प्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून जाणारे दोघे संशयास्पद आढळले.
पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच त्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर दोघांनी मोटारसायकल जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. रात्रभर सुरू असलेल्या शोधानंतर सकाळी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) व सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी डीपीमधील तांब्याच्या तारा चोरण्यासाठी आल्याची कबुली दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.
न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता या चोरीच्या घटनांमध्ये आणखी तीन साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संदीप यशवंत काळे (वय २३), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २१, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर) आणि राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वरवंडी, थापलीवस्ती खंडोबा, ता. संगमनेर) यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली.
या पथकांनी तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी पहिल्या दोन आरोपींच्या साथीने शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख २९ हजार ५०० रुपये आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार व शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, पोलीस हवालदार किरण ढुके, रोहिदास पास्त्रे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे तसेच पोलीस अंमलदार भारत भोसले, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे व योगेश भंडारे यांनी सहभाग घेतला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली किरण ढुके व भारत भोसले करीत आहेत.
नागरिकांच्या सतर्कतेला पोलिसांची शाबासकी
डीपी चोरांना पकडण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या उरळगाव येथील संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले व संजय चोरमले या सहा नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या तपासकार्यात नागरिकांनी दाखविलेली सतर्कता आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगत यादव यांनी नागरिकांचे विशेष कौतुक केले. तसेच गावाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनीही जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.