९५ हजारांची लाच घेऊन झाला होता पसार; शिरूर नगरपरिषद परिसरातून एसीबीने ठोकल्या बेड्या
शिरूर (अरुणकुमार मोटे): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाला चकवा देत पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश नाथराव मुंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल दीड महिन्यांपासून फरार असलेल्या मुंढेला सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास एसीबीच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवार (दि. २०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे शिरूरमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या लाचखोरी प्रकरणाला पुन्हा वेग आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात हवालदार सतीश मुंढे याने स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
त्यानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी टाकळी हाजी पोलीस चौकीत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी मुंढे याने एक लाख रुपयांची मागणी केल्याचे आणि तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
टाकळी हाजी पोलीस चौकीत मुंढे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच त्याने लाचेची रक्कम आणि तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन तेथून पलायन केले. त्यामुळे एसीबीच्या कारवाईदरम्यान मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेपासून मुंढे फरार होता. एसीबीचे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी सापळा रचला. सोमवारी सकाळी शिरूर नगरपरिषद परिसरातून मुंढेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुंढेच्या अटकेमुळे या प्रकरणातील पुढील तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, लाचेच्या मागणीमध्ये वरिष्ठांचाही उल्लेख असल्याने आता तपासात कोणती नावे समोर येतात आणि पुढे कोणावर कारवाई होते, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.
वरिष्ठांच्या नावाने लाच मागितली; आता त्यांची चौकशी होणार का?
एसीबीच्या पडताळणी कारवाईत हवालदार सतीश मुंढे याने तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला एक लाख रुपये आणि तडजोडीनंतर ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंढे याने नेमक्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी केली? लाचेची रक्कम वरिष्ठांपर्यंत पोहोचणार होती का? या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
केवळ लाच स्वीकारणाऱ्या हवालदाराच्या अटकेपुरतीच ही कारवाई मर्यादित राहणार, की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी होणार? लाचखोरीच्या या प्रकरणातील वरिष्ठांची नावे तपासातून समोर येणार का, याकडे आता शिरूरकरांचे लक्ष लागले आहे. मुंढेच्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती किती वाढणार, हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.