मुंबई: सुपर मॉडेल आणि अभिनेत्री सोनाली राऊत हिने ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शोमध्ये असताना घेतलेल्या एका निर्णयामुळे रंगलेल्या वादावर तिने आता थेट भूमिका मांडली असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांच्याबाबतही स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
टास्क नाकारल्यामुळे वादाची ठिणगी
‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना सोनालीने एक महत्त्वाचा टास्क खेळण्यास नकार दिला होता. नियमांनुसार तिला थेट नॉमिनेट करण्यात आले. त्यानंतर ‘भाऊच्या धक्क्यावर’ या विशेष भागात रितेश देशमुख यांनी तिच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रितेश यांनी स्पष्ट शब्दांत सुनावत म्हटले होते,“हा अॅटिट्यूड तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही दाखवायचा. इथे सगळे सारखे आहेत. यावेळेला फक्त नॉमिनेट केलंय, पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन.”या वक्तव्यानंतर घरातील वातावरण चांगलेच तापले होते. अनेक स्पर्धकही या प्रसंगामुळे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
“मला अपेक्षेपेक्षा जास्त राग व्यक्त केला गेला”
शोमधून बाहेर आल्यानंतर ‘इंडिया फोरम’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने या प्रसंगावर सविस्तर भाष्य केले.
ती म्हणाली,“रितेश देशमुख खूप ‘ओव्हररिअॅक्ट’ झाले असं मला वाटतं. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. मी त्यांना आधीपासून ओळखते आणि ते शो चांगल्या पद्धतीने होस्ट करत आहेत. पण त्या क्षणी मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाली.”सोनालीने सांगितले की, या घटनेचा तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला.“घराच्या आत नेमकं काय होतं, हे बाहेरून पूर्णपणे कळत नाही. ती गोष्ट मला मनाला खूप लागली आणि त्याचा परिणाम माझ्या गेमवर झाला,” असे ती म्हणाली.
होस्टवरही दबाव?
सोनालीने रितेश देशमुख यांची बाजूही समजून घेतल्याचे स्पष्ट केले. विविध भाषांमधील ‘बिग बॉस’च्या सीझन्समुळे होस्टची तुलना होत असते, विशेषतः मुंबईत असताना हिंदी आवृत्तीसोबत तुलना होणे टाळता येत नाही, असे तिचे मत आहे.
“हा त्यांचा दुसरा सीझन आहे. कदाचित त्यांच्यावरही दबाव असेल. प्रत्येक होस्ट स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्याच वीकेंडला ते खूप रागात होते आणि आम्ही सगळेच गोंधळलो होतो,” असे सोनालीने सांगितले.तिने हेही नमूद केले की, होस्ट स्वतः एपिसोड पाहून प्रतिक्रिया देतात की टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार बोलतात, याची तिला खात्री नाही.
सोशल मीडियावर रंगली चर्चा
सोनालीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. काहींनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी होस्ट म्हणून रितेश देशमुख यांनी शिस्तीच्या दृष्टीने योग्य भूमिका घेतल्याचे मत व्यक्त केले.दरम्यान, या वक्तव्यावर रितेश देशमुख प्रतिक्रिया देणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी 6’मधील हा वाद पुढे आणखी कोणते वळण घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.