‘द 50’मध्ये निक्की तांबोळीला अरबाज पटेलचा गुडघ्यावर बसून प्रपोज

मनोरंजन

मुंबई: टेलिव्हिजनवरील ग्लॅमरस आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री निकी तांबोळी सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विविध रिअॅलिटी शोमधील तिच्या दमदार उपस्थितीमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. सध्या ती The 50 या रिअॅलिटी शोमध्ये झळकत असून, तिच्या खेळातील स्ट्रॅटेजी आणि स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ती विशेष लक्ष वेधून घेत आहे.याच शोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल सहभागी झाला आणि त्याने सर्वांसमोर निक्कीला गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचा भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गुडघ्यावर बसून प्रपोज; स्टेजवरच व्यक्त केलं प्रेम

‘द 50’च्या मंचावर अरबाजने निक्कीला स्टेजवर बोलावलं आणि सर्वांसमोर गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज केलं. प्रपोज करताना तो म्हणाला,“माझ्यात बरंच टॅलेंट आहे. मी अनेकांना इम्प्रेस केलं आहे. पण कलर्सवरच कोणीतरी मला इम्प्रेस केलं होतं. निक्की मला अनेकदा म्हणायची की आपण एकमेकांना ऑफिशियली प्रपोज केलेलं नाही. त्यामुळे मला वाटलं, पुन्हा संधी मिळाली तर कलर्सवरच निक्कीला प्रपोज करेन.”

त्याने पुढे सांगितलं,“माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी रागात असलो तरी निक्कीला पाहिलं की माझा राग शांत होतो. निक्कीशिवाय मला दुसरं कोणीही शांत करू शकत नाही.”अरबाजच्या या शब्दांनी आणि प्रपोजलने सेटवर उपस्थित सर्वजण भावूक झाले.

निक्कीच्या डोळ्यांत अश्रू; वडिलांचा विरोध आणि धर्माचा मुद्दा

अरबाजच्या प्रपोजलनंतर निक्की तांबोळीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ती म्हणाली,“हा क्षण माझ्या आयुष्यात यावा असं मला कायम वाटायचं. पण मला भीतीही वाटतेय कारण माझे वडील या नात्याच्या विरोधात आहेत. आमचा धर्म वेगळा आहे. गेल्या दीड वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, पण माझे वडील हे नातं स्वीकारत नाहीयेत.”

निक्कीने पुढे सांगितलं की ती तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध हा निर्णय घेत आहे. “माझ्या आईने मला शिकवलं की, प्रेमासाठी कधीही मागे हटू नये. वडिलांचं प्रेम वेगळं आणि पार्टनरचं प्रेम वेगळं असतं. मला आशा आहे की एक दिवस माझे वडील आमचं प्रेम समजून घेतील,” असं ती म्हणाली.

‘बिग बॉस मराठी’मध्ये फुललेलं प्रेम

निक्की आणि अरबाजची प्रेमकहाणी Bigg Boss Marathi या लोकप्रिय रिअॅलिटी शोदरम्यान सुरू झाली. त्या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. शो संपल्यानंतरही त्यांचं नातं टिकून राहिलं आणि सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती आहे.

लग्नाबाबत बोलताना निक्कीने स्पष्ट केलं की, “जोपर्यंत मी किंवा अरबाज एखादा रिअॅलिटी शो जिंकत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचार नाही.”निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा हा रोमँटिक आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना भावला असून, सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता पुढे त्यांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.