पुढच्या रविवारी भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता…

मनोरंजन

आशिया: आशिया चषकातील दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ढेपाळला.

प्रत्युत्तरात भारतानं 5 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पूर्णपणे मनोरंजक ठरला. आता लवकरच हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात 2 गटात 6 संघाचं विभाजन करण्यात आलंय. भारत ‘अ’ गटात असून त्यांच्या गटात पाकिस्तान आणि हॉंगकाँचा समावेश आहे. तर, ‘ब’ गटात अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेशचा समावेश आहे. भारतानं पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे. तर, दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगशी भिडणार आहे. एका गटातून 2 संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. पाकिस्तानसाठी हाँगकाँगला हरवणं मोठी गोष्ट नाही. म्हणजेच ‘अ’ गटात भारत पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहून पुढील फेरीत प्रवेश करेल.

सुपर 4 फेरीत भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता

गट-अ आणि गट-ब मधील अव्वल दोन संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. हे सामने 3 सप्टेंबरपासून सुरू होतील. 3 सप्टेंबरला ब गटातील टॉप-2 संघ आमनेसामने येतील. यानंतर, 4 सप्टेंबर म्हणजेच रविवारी गट-अ मधील टॉप-2 संघ ऐकमेकांशी भिडतील. समीकरणे बरोबर राहिल्यास 4 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक रंजक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

अंतिम सामना कधी?

आशिया चषक 2022 च्या सहा संघांमध्ये भारत आणि पाकिस्तानची नावे बलाढ्य संघांमध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच सुपर-4 सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचू शकतात. असं झालं तर 11 सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीतही भारत-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना रंगण्याची शक्यता आहे.