रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग, कार्यसन पुणे व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत सुमारे २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त करुन तिघा संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संशयास्पद वाहनाचा पाठलाग…

२४ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे वस्तीजवळ पोलिसांनी गस्ती दरम्यान हि कारवाई केली. पोलिस पथकाला मारुती इको (क्र. एम.एच. १२ आर.एफ. ७११४) ही गाडी संशयास्पदरीत्या अतिजलद वेगाने जाताना दिसली. वाहन थांबविण्याचा प्रयत्न करुनही चालकाने गाडी न थांबवल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पथकाने पाठलाग करुन ही गाडी शिंदे वस्तीजवळ अडवली.

उग्र वासामुळे पोलिसांना संशय…

हे वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत तिघेजण बसलेले आढळले. वाहनाच्या डिकीत सीटखाली पांढऱ्या पोत्यांत काही वस्तू लपविलेल्या दिसल्या. त्या पोत्यांतून गांजाचा तीव्र वास येत असल्याचे पोलिसांना जाणवले. पंचांच्या समक्ष पिशव्या खाली उतरवून तपासल्या असता त्यामध्ये हिरवट पाने, फुले व काड्या मिसळलेला गांजा मोठ्या प्रमाणात आढळून आला.

त्यानंतर पोलिसांना गाडीत १) वसीम अब्दुल सय्यद (वय ३५, रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, अहिल्यानगर), २) मुबशीर उर्फ जिमी मन्सूर खान (वय २७, रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, अहिल्यानगर), ३)राहुल रामदास कनगरे (वय २६, रा. स्टेशन रोड, दत्तनगर, राहुरी, अहमदनगर) हे तिघेजण चारचाकी वाहनात बसलेले आढळले. तसेच हे वाहन हे वसीम सय्यद यांच्या मालकीचे असल्याचे उर्वरित दोन आरोपींनी चौकशीत कबूल केले.

संयुक्त पथकाची कारवाई…

या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे (ANTF) सहायक पोलीस निरीक्षक समाधान मचाले, शिवाजी बंद्रे, पोलीस अंमलदार अनिल पास्ते, पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश गवळी, प्रशांत बोमदंडी, चेतन चव्हाण, कॉन्स्टेबल किशोर बर्गे यांच्यासह रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके तसेच सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे वाहन चालक पांडुरंग साबळे यांनी सहभाग घेतला.

लाखोंचा मुद्देमाल जप्त…

जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखोंच्या घरात जाणारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांविषयी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. कारण गांजा व इतर अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत