रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील सृष्टी सोसायटीतील रो हाऊसवर धाड टाकुन पोलिसांनी तब्बल २८ किलो वजनाचा सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार फरार आहे.
दि २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सृष्टी सोसायटीतील घरात विक्रीसाठी गांज्याचा साठा ठेवण्यात आला आहे. त्यांनी तत्काळ हि माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना दिली. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता दोन पथकांसह छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आरोपी दिव्या अतुल गिरे (वय २७, रा. बाभुळसर खुर्द, मूळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि सुरज दिलीप शिंदे (वय २८, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली. घरात झडतीदरम्यान २८ किलो गांजा सापडला. या तपासात हा गांजा दिव्या हिचा पती अतुल वसंत गिरे (फरार) याने विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
या दोन्ही आरोपींना अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी अतुल गिरे याचा शोध सुरु असून, त्याने हा गांजा कोणाकडून आणला आणि कुणाला विक्री करणार होता याचा तपास सुरु आहे.
रांजणगाव MIDC पोलीसांकडुन अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. शाळा, कॉलेज, औद्योगिक वसाहतींमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जात असून, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. “अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीविरोधात ठोस पावले उचलली जातील, माहिती पोलिसांना द्यावी” असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर, हेमंत इनामे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, वाहनचालक पोलिस हवालदार माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, रामेश्वर आव्हाड यांनी केली आहे. केली. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?
शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी