महसूल महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक, महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथे कार्यरत महिला मंडल अधिकारी माधुरी वसंत बागले यांच्याशी झालेल्या असभ्य वर्तनाच्या घटनेने संपूर्ण महसूल प्रशासनात खळबळ उडवली आहे. भानुदास खामकर नामक व्यक्तीने फोनद्वारे त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याने, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आक्रमक झाला असून, संबंधित व्यक्तीवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खामकर यांच्यावर दोन दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

या निवेदनावेळी ग्राममहसुल अधिकारी आबासाहेब मोरे, ए. ए. जोरी, मनीषा राऊत, अनिता भालेराव, अनुष्का घुगे, आर.टी. घोडे, के.डी. माने, शलाका भालेराव, वाय.एस. टिळेकर, दिपाली नवले, जे.डी. धुरंदर, आर.जी. अरदवाड, आर.पी. जाधव, मंडल आधिकारी नंदकुमार खरात, कपिल बोडरे, अशोक बडेकर, सिद्धार्थ वाघमारे, आदित्य गायकवाड, सतीश पलांडे, दीपक मोरे, विकास फुके आदी कर्मचारी उपस्थित होते.

माधुरी बागले या सध्या मलठण येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांच्याकडे टाकळी हाजी मंडळाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्या कार्यकाळात शिनगरवाडी (ता.हाजी) येथील खातेदार भानुदास खामकर यांच्या रस्ता खुला करण्याच्या अर्जावर कार्यवाही करत, तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्यात आला होता.

मात्र, दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता खामकर यांनी बागले यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क करून, संबंधित प्रकरणावरून अश्लील आणि लज्जास्पद भाषा वापरत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर “तुला बघून घेईन” अशी थेट धमकीही दिली. हा प्रकार केवळ एका महिला अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा नसून, एकूणच महसूल प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.

घटनेचा महसूल विभागातील महिला व पुरुष दोन्ही अधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. तलाठी संघटनेच्या मते, अशा प्रकारची वागणूक प्रशासकीय यंत्रणेतील कार्यक्षम अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारी आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई अनिवार्य असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या प्रकरणामुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले दबाव व दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमुळे अधिकाऱ्यांचे काम अडथळ्यात येत असून, प्रशासनाने यावर ठोस भूमिका घेतली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे प्रशासन काय भूमिका घेते, संबंधितावर कोणती कारवाई होते आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.