शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता.शिरूर) ते लोणी (ता. आंबेगाव) या रस्त्याची खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
लोणी व पाबळ येथे उपबाजार समिती असल्याने या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सविंदणे, कवठे येमाई, इचकेवाडी, वाळुंजनगर आदी ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. सविंदणे ते लोणी या दोन गावांमधील अंतर सुमारे सहा किलोमीटरचे आहे. मात्र, दोन्ही गावच्या हद्दीवरील सटवाई देवी मंदिर ते वाळुंजनगर पर्यंत सुमारे दिड किलोमीटर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यातच काही ग्रामस्थांनी रस्ता खोदून जलवाहिन्या केल्या आहेत. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यावर वरच्यावर माती टाकून, तसेच सोडून दिलेले आहे. यामुळे या ठिकाणी वाहने जाऊन मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, या रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आली तर खाली कोणी उतरायचे यावरून वाहनचालकांमध्ये अनेकवेळा वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण लवकरात लवकर करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सविंदणे – लोणी रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविण्याच्या कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तातडीने खड्डे बुजविण्यात येतील. तसेच, आवश्यक त्या ठिकाणची झुडपे ही काढण्यात येतील.
राजन चव्हाण
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
“सविंदणे ते लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती व रुंदीकरण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल.”
मनिषा नरवडे
सरपंच, सविंदणे