लहान मुलांमधील बद्धकोष्ठता

आरोग्य

लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे) हा सामान्य प्रकार आहे. अधून मधून मोठ्या आतड्यात होणाऱ्या हालचाली आणि कडक मल ही ह्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. बद्धकोष्ठता ही काही गंभीर परिस्थीती नाही. परंतु काही वेळा लहान मुलांना मल बाहेर काढतांना वेदना होतात, त्यामुळे मुले मलोत्सर्जनाची क्रिया अडवतात आणि मल क्रिया नैसर्गिकरित्या होऊ देत नाही. क्रोनिक बद्धकोष्ठतेच्या विकारावर वैद्यकीय उपचारांची गरज असते, नाहीतर गंभीर आजार होऊ शकतो.

मुख्य लक्षणे

एक आठवड्यात तीन पेक्षा कमी वेळा मलनिस्सारण होणे. कोरडा आणि घट्ट मलनिस्सारण सहजपणे होत नाही. मोठ्या आकाराचा मल सहजपणे निघत नाही. मलनिस्सारण होताना वेदना होणे. पोटदुखी किंवा पोटात पेटके येणे. मलाबरोबर रक्तस्राव होणे. लहान मुलांच्या अंतर्वस्रावर कोरड्या मलाच्या खुणा दिसून येणे.

होण्याची मुख्य कारणे

कुटुंबात बद्धकोष्ठतेचा इतिहास असणे. वैद्यकीय किंवा जन्मतः पचनसंस्थेत दोष असणे. काही प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी असणे किंवा ते अन्न न पचणे. काही प्रकारच्या औषधांचे दुष्परिणाम होणे. नेहमीच्या आहारात किंवा आहाराच्या वेळेत बदल होणे. शौचालय वापरताना त्रास होणे. मलनिस्सारण प्रक्रिया मुद्दाम अवरोधित करणे.

निदान

लहान मुलाचा वैद्यकीय इतिहास आणि त्याची शारीरिक तपासणी बद्धकोष्ठतेचे निदान होण्यास पुरेशी असते. वैद्यकीय मोजे घालून बोटांनी गुदद्वाराची विकृती आहे का याची तपासणी केली जाते. तसेच पोटाचा एक्स-रे, आतड्याची बायोप्सी, मार्कर चाचणी किंवा रक्त चाचणी सुध्दा केली जाऊ शकते.

उपचार

आहारात आणि जीवनशैलीत बदल ही उपचाराची प्रथम पायरी आहे. भरपूर तंतुमय आहार आणि पुरेसे पाणी यामुळे मोठ्या आतड्याच्या हालचाली व्यवस्थित होण्यास मदत होते. काही वेळेस डॉक्टर मल मऊ करणारी औषध देतात, ज्यामुळे मलनिस्सारण सहज होते. मलनिस्सारणात अडथळे येत असतील, तर एनिमाचा वापर केला जातो. बद्धकोष्ठतेची परिस्थिती गंभीर असेल, तर मुलाला हॉस्पिटल मध्येच एनिमा द्यावा लागतो.

(सोशल मीडियावरून साभार)