हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब

आरोग्य

बदलती जीवनशैली आणि इतर अनेक बदलांमुळे हे आजार दिवसेंदिवस कमी वयाच्या रुग्णांना होत असल्याचं दिसत आहे. हायपरटेन्शन याचाच अर्थ हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब होय. रक्तदाब हा दोन प्रकारे नोंदवला जातो. यात सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे उच्च पातळी वरील दाब. रक्तदाब सुरक्षित पातळीच्या वर जातो, त्याला हाय ब्लडप्रेशर म्हणजेच हायपरटेन्शन म्हटलं जातं. आणि डायस्टोलिक प्रेशर म्हणजे कमी पातळीवरील दाब. हे दोन्ही मिलिमिटर मध्ये मोजले जातात. युनायटेड किंग्डमच्या एनएचएस आरोग्यसेवे नुसार, जर तुमची रक्तदाबाची नोंद १४०-९० अशी आली तर त्याला उच्च रक्तदाब म्हटले जाते. जर तुमचे वय ८० च्या पुढे असेल तर १५०-९० पासून उच्च रक्तदाब म्हटले जाते.

उच्च रक्तदाबामुळे होणारे धोके

जर तुमचा रक्तदाब सतत जास्त असेल तर रक्तवाहिन्यांवर त्याचा सतत ताण येत राहातो. त्याचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, डोळे अशा अवयवांवर होत राहातो. आणखी हे प्रमाण कायम राहिले तर हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता वाढते. स्ट्रोकची शक्यता वाढते. किडनी संदर्भातील आजार सुरू होतात किंवा किडनीचं काम बंद पडू शकतं. अनेक रुग्णांच्या डोळ्यातील रेटिना मधील रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे दृष्टी जाऊ शकते. रक्ताची गुठळी होण्याचा धोका संभवतो तसेच चयापचय संबंधित आजार, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉलकडे वाटचाल होऊ शकते.

हायपरटेन्शनची कारण

उच्च रक्तदाबाची अनेक कारणं सांगितली जातात. तसेच त्याचे एकमेव असे कारण सांगता येत नाही. तरीही काही बाबतीत उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. जर तुमचं वजन अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त असेल तर, तुम्ही भरपूर मीठ खात असाल आणि फळं भाज्या कमी प्रमाणात खात असाल तर, तुमची जीवनशैली बैठी असेल आणि व्यायाम करत नसाल तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही भरपूर दारू, कॉफी, कॅफिन असलेली पेयं पित असाल, धूम्रपान करत असाल, तुमच्यावर फार ताण असेल, तुमचे नातलग, कुटुंबातील आधीच्या पिढ्या मध्ये हा त्रास असेल तर हायपरटेन्शनचा धोका संभवतो. तसेच वय वाढण्यानुसारही रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढतं वय हा सुद्धा एक घटक त्याला कारणीभूत आहे.

उच्च रक्तदाबावर उपाय

रक्तदाब नियंत्रणात राहावा आणि पुढील गुंतागुंत टळावी यासाठी जीवनशैलीत मोठे बदल आणि औषधं घ्यावी लागतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो आहार आणि व्यायामाचा. आहारामध्ये डॅश म्हणजे डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शनचा समावेश करतात म्हणजे त्यात भरपूर फळं, भाज्या, धान्यं आणि कमी मेदयुक्त डेअरी पदार्थावर भर असतो. आठवड्यातून मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम किमान १५० मिनिटं करणं आवश्यक आहे. लठ्ठ असाल किंवा वजन जास्त असेल तर वजन कमी करणं आवश्यक आहेत. जेवणामध्ये सोडियम कमी करण्यासाठी मिठावर नियंत्रण हवे. दारू आणि धूम्रपान बंद केले पाहिजे. ताण कमी करण्यासाठी माइंडफुलनेस, ध्यान किंवा डिप ब्रिदिंग केलं पाहिजे. तसेच जर याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेता येतील. गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर प्रमाणात मीठ वापरलेले पदार्थ बाजारात दिसून येतात. घरी जेवणात असलेलं मीठ आणि बाहेर खाल्ले जाणारे पदार्थ तसेच पाकिटबंद पदार्थ यामुळे लोकांच्या आहारातलं मिठाचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. आरोग्यासाठी दररोज पाच ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

आयोडाइज्ड मीठ वापरावं

सॉस-केचप, बिस्किटं, चिप्स, चिज, खारवलेले मासे यांचं प्रमाण कमी करावं.

भाज्या आणि फळांतून पोटॅशियम मिळवा.

अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांत भरपूर साखर-मीठ आणि मेदयुक्त पदार्थ असतात. त्यात पोषणमूल्यं आणि तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स कमी असतात.

या पदार्थांमध्ये कॅलरी मात्र भरपूर असतात. त्यामुळे या सुचनांमध्ये एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे सर्वांनी सॉस, चिज, मेयोनिज, जॅम, फ्रुट पल्प, ज्युस, कार्बनयुक्त पेयं, पाकिटबंद रस असे पदार्थ कमी खावेत.

घरातही भरपूर तेल-तूप, साखर, मीठ वापरुन पदार्थ केल्यास तेही चांगलं ठरणार नाही. बाहेर खाताना तर जास्त काळजी घेतली गेली पाहिजे. तळलेले, गोड, खारट, बेकरीतले पदार्थ टाळावे.

भरपूर मीठ असलेल्या पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा त्रास होतो आणि किडनीवरही परिणाम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)