स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही

आरोग्य

साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते.

डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते.

तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं.

सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही. या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.

(सोशल मीडियावरून साभार)