पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर डीजेचे साउंड बॉक्स आणि लोखंडी सांगाडा उतरवताना तो अचानक कोसळून एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे.
जुन्या सांगवीतील गल्ली क्रमांक २ मध्ये ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील ‘विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळा’चा दहीहंडी उत्सव सुरू होता. सलमा पठाण यांचा मुलगा या मंडळात सक्रिय गोविंदा म्हणून सहभागी झाला होता. आपला मुलगा दहीहंडी फोडताना पाहण्यासाठी सलमा या पती सलाउद्दीन यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी आल्या होत्या.
रात्री सुमारे १०.०५ वाजता दहीहंडी फुटल्यानंतर त्या पतीसोबत घरी जाण्यासाठी निघाल्या. त्याचदरम्यान आयोजकांकडून स्टेजची भव्य कमान आणि त्यावरील डीजेचे साउंड बॉक्स उतरवण्याचे काम सुरू होते.मात्र, साउंड बॉक्सचे वजन न पेलवल्याने लोखंडी कमान अचानक कोसळली आणि डीजेच्या साउंड बॉक्ससह ती सलमा यांच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलगा गोविंदा म्हणून सहभागी; आईचा मृत्यू
आपला मुलगा दहीहंडी फोडताना पाहून आनंदी झालेल्या आईला कार्यक्रम संपल्यानंतर काही मिनिटांतच अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुलगा मंडळात सहभागी असल्याने पठाण कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.
प्रशासनाच्या परवानगीपासून सुरक्षेच्या नियमांपर्यंत प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर दहीहंडीच्या भव्य स्टेज आणि लोखंडी कमानीला प्रशासनाची योग्य परवानगी होती का? कमान आणि डीजेचे साउंड बॉक्स उतरवताना आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती का? एवढे वजनदार साउंड बॉक्स बसवलेल्या लोखंडी संरचनेची सुरक्षितता तपासण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असेल, तर संबंधित आयोजक आणि कंत्राटदारावर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अकस्मात मृत्यू’ची नोंद; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होणार?
सध्या सांगवी पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मात्र, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास आयोजक अथवा संबंधित कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजावरून आधीच चर्चा सुरू असताना दहीहंडीच्या कार्यक्रमातील या दुर्घटनेने भव्य स्टेज, डीजेची यंत्रणा आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.