मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हाप्पे यांना निष्ठावान, कर्मठ आणि अहंकारविरहीत कार्यकर्ता म्हणून गौरविले.
सपकाळ म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाही हाप्पे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीने पुढे नेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही हाप्पे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या निष्ठा आणि साधेपणाचे विशेष कौतुक केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध आणि पंढरपूर वारीतील त्यांचा सहभाग याचा त्यांनी उल्लेख केला.या शोकसभेला अभय छाजेड, वजाहत मिर्झा, गणेश पाटील, राजेश शर्मा, ब्रिज दत्त, अतुल लोंढे, धनंजय शिंदे, विश्वजित हाप्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.