मुंबई: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वीणदिनी त्यांना शैक्षणिक साहित्यांची मानवंदना द्यावी असे आवाहन एक वही,एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिम्मित देशभरातील लाखो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येत असतात.अभिवादन करताना आपल्यासोबत हार फुले मेणबत्ती अगरबत्ती सोबत घेऊन येतात . अनुयायांनी अर्पण केलेले हे साहित्य नंतर कच-यामध्ये जाते.त्यामुळे या नाशवंत वस्तूंऐवजी वह्या, पेन, पुस्तके पेन्सिल, दप्तर कंपास, आदी शैक्षणिक साहित्य चैत्यभूमीवर दिल्यास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना ते खरे अभिवादन राहील असे एक वही एक पेन अभियानचे प्रणेते पत्रकार राजू झनके यांनी म्हटले आहे.
प्रकांड पंडीत असलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षित होण्याचा मंत्र दिला होते.त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार अनुयायांनी चैत्यभूमीवर येताना किंवा राज्य व देशभरात ६ डिसेंबर रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करावे.यावेळी जमा झालेले शैक्षणिक साहित्य सबंधित संस्था मंडळे व समित्यांनी समाजातील वंचित आदीवासी व गरजू तसेच पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना वितरीत करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही ,एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
दादर चैत्यभूमीवरील भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक,सेनापती बापट सर्कल चैत्यभूमी मार्ग भारतीय बौद्ध महासभा मंडप या ठिकाणी महामानव प्रतिष्ठान, दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ ईंडिया , यांच्या वतीने ५ व ६ डिसेंबर रोजी शैक्षणिक साहित्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.तसेच फॅम संघटनेच्या वतीने दिवंगत मीनाताई ठाकरे पुतळ्यामागे संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे.चैत्यभूमीवर येणा-या आंबेडकरी अनुयायांनी आपले शैक्षणिक साहित्य वरील केंद्रावर द्यावे असे आवाहन राजू झनके यांनी केले आहे.हे साहित्य गरजू आणि पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार येईल .अधिक माहीती व संपर्कासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.