रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अजितदादांनी दिला सल्ला; म्हणाले, भान ठेवूनच वागलं पाहिजे…

महाराष्ट्र राजकीय

पुणे: विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारीची घटना नुकतीच घडली. यानंतर आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे पोलिसांच्या भूमिकेविरोधात आक्रमक झाले होते. याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यदरम्यान पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अधिवेशन काळामध्ये आमदारांच्या बाबतीत घडलेल्या घटनांमुळे आमदार कशा पद्धतीने वागायला पाहिजे, हे विसरलेत का? असं अजितदादांना पत्रकारांनी विचारले होते.

त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, रोहित पवार यांच्याशी बोलून त्यांना विचारतो की ते काही विसरलेत का? आणि त्यानंतर मी त्याबाबत तुम्हाला सांगेल, असं सांगत अजित पवार यांनी आपल्याला याबाबत अधिक काही माहीत नसल्याचं सांगितलं. तसेच अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या प्रेस नंतर मी थेट बारामती गाठली. त्यानंतर सातत्याने दौरा आणि बैठका सुरू आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत मला काहीच कल्पना नसल्याचेही ते म्हणाले.

आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विरोधक असो वा सत्ताधारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि कायद्यानुसारच वागलं पाहिजे. कोणी पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असेल अथवा 30 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचे प्रतिनिधित्व करत असले तरी देखील त्यांनी भान ठेवूनच वागलं पाहिजे, असा सल्लाही अजितदादांनी दिला.

मी नेहमी सांगत असतो की सुसंस्कृत महाराष्ट्राची जी परंपरा आपल्याला स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सांगितली आहे. ती फक्त ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये आणण्याचा देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागतात, त्यामुळे सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात. त्यामुळे लोकं म्हणतात की, हे लोकप्रतिनिधी फारच स्वतःला शहाणे समजायला लागले आहेत. यांना कायदा म्हणजे काहीच वाटत नाही. त्यामुळे माझ्यासहित सर्व लोकप्रतिनिधींनी तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.