वाघिणीच्या दहशतीने 15 गावांमधील 18 शाळा बंद

महाराष्ट्र

अधिकाऱ्यांनी वाघिणीला गोळी घालून ठार मारण्याची मागितली परवानगी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील १५ गावांमधील १८ सरकारी शाळा एका वाघिणीच्या सततच्या हल्ल्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या आहेत. या वाघिणीने गेल्या काही दिवसांत तिघांचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

१७ जुलै रोजी बिथरा मंदारिया येथे एका महिलेला वाघिणीने मारल्याची घटना घडली. याआधीही दोन हल्ले घडल्यामुळे प्रशासनाने शाळा (School) बंद करण्याचा निर्णय घेतला. विभागीय वन अधिकारी भरत कुमार डीके यांच्या मागणीनुसार, जिल्हा दंडाधिकारी ज्ञानेंद्र सिंह यांनी यावर संमती दिली. त्यानंतर मूलभूत शिक्षण अधिकारी अमित कुमार सिंह यांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. ही बंदी वाघिणीला पकडल्यावरच हटवली जाणार आहे.

वाघिणीच्या शोधासाठी मोहीम

पिंजरे आणि गस्त पथकांचा वापर करून वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु आतापर्यंत हे सर्व अयशस्वी ठरले आहे. वाघिणी ऊस आणि भातशेतीतून पळून जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गोळी मारण्याची मागितली परवानगी

वाघिणीने वारंवार हल्ले केल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी तिला गोळी मारण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनशी चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाचे प्रादेशिक संचालक रमेश चंद्र यांच्याशीही चर्चा झाली आहे. वाघिणीच्या पूर्व इतिहासाचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

वाघिण शेवटची कुठे दिसली?

वाघिणीची शेवटची उपस्थिती १८ जुलै रोजी दांडिया गावात नोंदली गेली. हे गाव ताज्या हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. पीटीआरचे डीएफओ मनीष सिंह यांनी सांगितले की, वाघिणीचे ठसे खाकरा नदी ओलांडतांना सापडले.