मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या निकषांनुसार बालवाटिका-१ अर्थात नर्सरीसाठी तीन वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे. हे वय प्रवेशाच्या वर्षातील ३० जूनपर्यंत पूर्ण झालेले असावे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून या नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.
शासन निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नर्सरी किंवा बालवाटिका-१ प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. २०२८-२९ पासून बालवाटिका-२ अर्थात ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे, २०२९-३० पासून बालवाटिका-३ अर्थात सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे, तर २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष लागू होईल.
यापूर्वी राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे निकष वेगवेगळ्या तारखांनुसार निश्चित केले जात होते. तसेच पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये प्रवेशासाठी निश्चित वयोमर्यादेची अट नव्हती. केंद्र शासनाने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्य शासनाने आता सर्व स्तरांसाठी वयोमर्यादेचे निकष निश्चित केले आहेत.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना हे नवीन निकष लागू होणार नाहीत. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील उच्च वर्गात प्रवेश देताना वयोमर्यादेच्या निकषांतून सूट देण्यात आली आहे.
पूर्वप्राथमिक वर्गांपासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेश देताना शाळाप्रमुखांना निर्धारित किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देता येणार आहे. पायाभूत वर्गांतील नामांकन तसेच नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
नवीन वयोमर्यादेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून जारी करण्यात येणार आहेत.