बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी चर्चेत; सोनं-चांदी ठरणार सुरक्षित गुंतवणूक

महाराष्ट्र

जगभरात संभाव्य आर्थिक संकटाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली असून यामागे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भाकितांचा उल्लेख होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पैशांची टंचाई निर्माण होणार असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संकटाच्या काळात सोनं, चांदी आणि तांबं या धातू सुरक्षित गुंतवणूक ठरतील, असं बाबा वेंगांनी भाकीत केलं होतं.

चर्नोबिल दुर्घटनेसारख्या अनेक घटनांची अचूक भविष्यवाणी केल्याचा दावा बाबा वेंगांबाबत केला जातो. त्यामुळे त्यांच्या 2026 मधील आर्थिक संकटाच्या भाकिताकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात आहे. काही अफवांनुसार येत्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास भारतात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2.11 लाख ते 2.43 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, जो आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक असेल.

सध्या एमसीएक्सवर सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.69 लाख रुपये दराने व्यवहारात आहे. 2025 पासून आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचं चित्र आहे. भारत दरवर्षी 100 टनांहून अधिक सोन्याची आयात करतो, हेही किमती वाढण्यामागील महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

बाजारतज्ज्ञांच्या मते, ईटीएफमधील गुंतवणुकीमुळे दिवाळी 2026 पर्यंत सोन्याचा दर 1.62 ते 1.82 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे बाबा वेंगांचं भाकीत प्रत्यक्षात उतरत असल्याचं चित्र काही अंशी दिसून येत आहे.

दरम्यान, चांदीच्या बाजारातही मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सध्या चांदीचा दर सुमारे 1.25 लाख रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतींमध्ये जवळपास 9 टक्क्यांची वाढ झाली होती. एका टप्प्यावर चांदीने प्रति किलो 4 लाख 20 हजार 48 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर दर घसरून 3 लाख 99 हजार 893 रुपये इतका झाला.

त्याच दिवशी सोन्याच्या किमतीतही सुमारे 9 टक्क्यांची वाढ झाली होती. सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 80 हजार 779 रुपये या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलं होतं, नंतर एमसीएक्सवर ते 1 लाख 69 हजार 403 रुपयांवर स्थिरावलं.

या पार्श्वभूमीवर येत्या काळात सोने आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, असं मत बाजारतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.