अमरावती: महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना युवा स्वाभिमानला सोबत घेतले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)लाही युतीत सहभागी करून घेत राजकीय चेकमेट खेळी खेळली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी ‘महापौर भाजपचाच’ असा प्रचार निवडणुकीनंतर राबविणाऱ्या युवा स्वाभिमानला भाजपने त्यांच्या शैलीतच उत्तर दिले आहे.
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रभावक्षेत्रात युती धाब्यावर बसवत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणारे आमदार रवी राणा आणि भाजपात राहूनच अनेक अधिकृत उमेदवारांविरोधात खुली भूमिका घेणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट संदेश देणारी खेळी भाजपने महापौरपदाच्या उमेदवार घोषणेद्वारे केली आहे.
मनपा निवडणुकीत रवी राणा यांनी भाजपविरोधात युवा स्वाभिमानचे उमेदवार उभे केले होते. त्या उमेदवारांच्या प्रचारात नवनीत राणा यांनीही उघड भूमिका घेतली होती. आज महापौरपदासाठी घोषित करण्यात आलेल्या श्रीचंद तेजवानी यांच्या विरोधात पुरुषोत्तम बजाज यांचा, तर आशिष अतकारे यांच्या विरोधात राजा बांगडे यांचा प्रचार नवनीत राणा यांनी केला होता. युवा स्वाभिमानमुळे भाजपचे डझनभर उमेदवार पराभूत झाल्याने पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला होता.
सध्या महापालिकेतील संख्याबळाचे गणित जुळवताना भाजपने १५ जागा असलेल्या युवा स्वाभिमानला जवळ केले असले, तरी श्रीचंद तेजवानी व आशिष अतकारे यांच्या नावांची घोषणा करून राणा दाम्पत्याला ‘अधिकृत उमेदवारांविरोधातील भूमिका सहन केली जाणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीला सोबत घेत राणांवर वचक ठेवण्याची रणनीतीही आखली आहे.
आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. प्रारंभी खोडके यांनी राणा युतीत असतील तर आम्ही सहभागी होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर खोडके यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी युतीत सहभागी होण्यास तयार झाली. ‘सर्वकाही व्यवस्थित होईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे,’ असे आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे संख्याबळ बहुमतापलीकडे
महापालिकेत भाजप २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी त्यांना युतीचा आधार घ्यावा लागला. राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांच्या पाठिंब्याने भाजपप्रणीत महायुतीचे संख्याबळ आता ५१ वर पोहोचले असून बहुमतासाठी आवश्यक असलेला ४४ चा आकडा सहज पार झाला आहे. युवा स्वाभिमानकडे १५ जागा आहेत.
राष्ट्रवादीला झुकते माप
युवा स्वाभिमानची कोंडी करण्याच्या रणनीतीत भाजपने राष्ट्रवादीला झुकते माप देण्याची नीती स्वीकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. उपमहापौरपदावर तोडगा काढत स्थायी समितीचे महत्त्वाचे सूत्र राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. थेट राणा दाम्पत्यावर वार न करता राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकीय शिकार साधण्याचा हा भाजपचा डाव मानला जात आहे.