डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप

महाराष्ट्र

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9 मराठीशी बोलत असताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मारहाणीचा निषेध केला आहे.

बापट यांनीही या घटनेवर संयत प्रतिक्रिया देत, हा प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

बापटांना मारहाण होणे लांछनास्पद’

“विद्याधर बापट यांना मारहाण झाली, ही लांछनास्पद गोष्ट आहे. मी त्यांना फोन करून विचारपूस करणार असून, त्यांची भेटही घेणार आहे. बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेशी मी सहमत आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

डीजेचा आवाज एका मर्यादेपेक्षा अधिक वाढवल्यास त्याचा नागरिकांना त्रास होतो. विशेषतः लहान बालके तसेच कानाच्या पडद्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणावर निर्बंध असणे गरजेचे असल्याचेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

“विद्याधर बापट यांना अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे आहे. हा त्यांचा स्वतःचा आवाज आहे. संयम बापट यांच्याकडून शिकला पाहिजे. स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, तर अशा प्रकारांना प्रोत्साहन देता कामा नये,” असेही त्यांनी सांगितले.

एमपीएससी पेपरफुटीची चौकशी लवकर करा

दरम्यान, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरही नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुण्यात बैठक घेण्यात आली आहे. मुंबईतही विद्यार्थ्यांकडून फोन आणि संदेश येत असल्याचे त्यांनी सांगितले.

“या प्रकरणातील जे कोणी आरोपी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लॅपटॉप खाडीत टाकल्याचे सांगितले जात आहे, तर ऋतुजा पाटील आणि इतर आरोपींचे फोन खराब असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिजित लेंडवे यांच्या काही पेपरवर स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लवकर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निवेदन दिले आहे,” अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य

दिशा सालियन प्रकरणाबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, अनेक वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबाचा आवाज न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. “नक्कीच यात पुरावे सापडतील आणि दिशा सालियन व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, डीजेच्या गोंगाटाविरोधात भूमिका मांडल्यामुळे बापट यांना झालेल्या मारहाणीवरून आता राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असल्याने पोलिसांकडून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत