पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

महाराष्ट्र

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी एका ठेकेदाराला “सुधारणा केली नाही तर विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार”, असे संतापजनक वक्तव्य केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध स्मशानभूमींमधील विद्युत दाहिन्या नादुरुस्त असल्याचा मुद्दा मोरे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. दाहिन्यांच्या दुरुस्तीसंदर्भात पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत मोरे यांनी संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. “यापुढे या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार नाही. ठेकेदारांनी सुधारणा केली नाही तर मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, बुधवारची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यामुळे मोरे यांच्या वक्तव्यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपकडूनही तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

लोकप्रतिनिधींनी प्रशासनातील त्रुटींवर आक्रमकपणे आवाज उठवणे अपेक्षित असले, तरी एखाद्याला जिवंत जाळण्याची भाषा करणे योग्य आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत