राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या केंद्रांच्या उभारणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य सहजपणे उपलब्ध व्हावे, यासाठी ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी मोठ्या शहरांमध्ये वारंवार जाण्याची गरज भासू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येणार असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रे कार्यान्वित झाली असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

या केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा व CAP प्रक्रियेची माहिती, अर्ज भरणे, शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे, हॉल तिकीटाशी संबंधित अडचणी, शिष्यवृत्ती योजनांची माहिती, करिअर मार्गदर्शन, अंदाजात्मक समुपदेशन (Predictive Counselling), तांत्रिक व पेमेंटशी संबंधित समस्यांचे निराकरण तसेच इंटर्नशिप व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण, शंकांचे समाधान आणि आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्याची सुविधाही या केंद्रांमध्ये उपलब्ध असेल.या सर्व सेवा राज्यभरातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रांमधून १० जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत