मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली. तसेच एसआयटी चौकशी ही केवळ धुळफेक असल्याचा आरोप करत चंपत राय आणि अनिल मिश्र यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
नाशिक येथील काळाराम मंदिरातून काँग्रेसच्या ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात खासदार शोभा बच्छाव, मोहन जोशी, शरद अहिर, निलेश (बब्लू) खैरे, रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, संदीप पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
सपकाळ यांनी आरोप केला की, रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या अब्जावधी रुपयांच्या देणग्या आणि सोने-चांदीच्या वस्तूंचा कथित गैरव्यवहार झाला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच, “आदिवासी, मागासवर्गीय किंवा अल्पसंख्याक समाजातील कोणी आरोपी असता तर त्यांच्या घरावर तातडीने बुलडोझर चालवला गेला असता. मग चंपत राय आणि अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढे आरोप केला की, राम मंदिर ट्रस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती करण्यात आली असून ट्रस्टला माहितीच्या अधिकाराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रामभक्तांच्या देणग्यांचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशीही त्यांनी मागणी केली.
काँग्रेसचा हा सत्याग्रह ९ जुलैपासून राज्यभर राबविण्यात येणार असून, “प्रभू रामाच्या नावावर कथित गैरव्यवहार करणाऱ्यांना प्रायश्चित्त करावे लागेल,” असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.