RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागात संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करत काही अधिकाऱ्यांची नावे आणि कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर केल्या.

वडेट्टीवार यांनी नागपूरसह विदर्भातील काही RTO कार्यालयांमध्ये चोरीच्या वाहनांची नोंदणी, बेकायदेशीर वसुली आणि करचुकवेगिरीचे प्रकार होत असल्याचा आरोप केला. तसेच १५ वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

सभागृहात बोलताना त्यांनी काही अधिकारी मिळून वसुलीचे रॅकेट चालवत असून सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ACB ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिपही त्यांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केल्या.

महागड्या आयातीत वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून राज्याच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचाही मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.या आरोपांवर उत्तर देताना सरकारने प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. IPS अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय SIT एका महिन्याच्या आत अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली.

सरकारने स्पष्ट केले की, सभागृहात करण्यात आलेल्या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल. सेवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल तपासणी करण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

याशिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही इतर राज्यांत वाहन नोंदणी करून करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्याचा विचार सुरू असल्याचेही सरकारने सांगितले. वाहन नोंदणीवेळी राहण्याचा पुरावा, कर्जाची माहिती आणि GST पडताळणी अधिक काटेकोर करण्याची प्रक्रियाही मजबूत करण्यात येणार असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत