काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल

मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर काँग्रेस व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

एका महिला खासदारांनी माध्यमांमध्ये Rajiv Gandhi यांनी १९८८ सालीच महिला आरक्षण दिल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्या काळात अशा प्रकारचे कोणतेही विधेयक अस्तित्वात नव्हते. “१९८३-८४ पासून मी महिला चळवळीत कार्यरत आहे. १९८८ मध्ये ‘नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन’च्या बैठका झाल्या होत्या, मात्र महिला आरक्षणाचा कायदा तेव्हा आलेलाच नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण मिळावे यासाठी देशभरात दीर्घकाळ संघर्ष झाला. त्यातूनच १९९२-९३ मध्ये ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती मंजूर झाली, असे त्यांनी नमूद केले. मात्र १९९६ ते २०२३ या काळात काँग्रेसने महिला आरक्षणाबाबत ठोस राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोप त्यांनी केला.

“आज महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसकडून ‘पुतना मावशीचे प्रेम’ दाखवले जात आहे. महिलांनी हा डाव ओळखला पाहिजे,” असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनीही काँग्रेस, समाजवादी पक्ष व इंडिया आघाडीतील पक्षांच्या भूमिकेवर टीका केली आहे. महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या या पक्षांनी महिलांच्या न्यायाच्या लढ्याला वारंवार धक्का दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला, तर पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांना कायदेशीर हक्क मिळवून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगताना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्लीतील ‘तंदूर कांड’ तसेच लातूरमधील कल्पना गिरी प्रकरणाचा उल्लेख केला.

एनडीए सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून, Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “महिलांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी एनडीए, शिवसेना आणि महायुतीतील पक्षांचा लढा कायम राहील,” असे त्यांनी शेवटी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत