मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरबिर सिंग, बर्नाड डिमेलो आणि श्रीकांत मोडक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या तिघांनी जानेवारी 2026 मध्ये क्लबच्या टेरेसवर आयोजित केलेल्या बैठकीत Bhima Koregaon case मधील काही आरोपींना एकत्र आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. संबंधित आरोपींवर न्यायालयाने घालून दिलेल्या जामीन अटींचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेता या प्रकरणाला गांभीर्याने घेण्यात आले.
काय घडले होते?
19 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी क्लबच्या टेरेसवर झालेल्या या बैठकीस वरवरा राव, वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे, हॅनी बाबू, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांसारखे आरोपी उपस्थित होते. चौकशीत ही केवळ सामाजिक भेट नसून नियोजित बैठक असल्याचे समोर आले.
तक्रारीनंतर कारवाई
या घटनेनंतर क्लबकडे दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर गुरबिर सिंग यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी नोटीस सार्वजनिक करत भ्रामक माहिती पसरवल्याचेही निदर्शनास आले.
चौकशी समितीचा अहवाल
क्लबच्या मॅनेजिंग कमिटीने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. सीसीटीव्ही फुटेज, बिल नोंदी आणि एन्ट्री रजिस्टरच्या आधारे गुरबिर सिंग यांचा या बैठकीत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच डिमेलो आणि मोडक यांनीही बैठक आयोजित केल्याचे मान्य केले.
निर्णय कसा झाला ?
27 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत बहुमताने तिघांच्या हकालपट्टीचा ठराव मंजूर करण्यात आला. क्लबच्या बायलॉजनुसार सहा वर्षांसाठी ही कारवाई लागू राहणार आहे.
क्लबची भूमिका स्पष्ट
मुंबई प्रेस क्लब प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही व्यक्तीवर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र संस्थेची प्रतिमा मलिन होईल किंवा न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल अशा कृतींविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे.पत्रकारितेच्या मूल्यांचे रक्षण करताना कायद्याचे पालनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे क्लबने अधोरेखित केले आहे.