आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

महाराष्ट्र

२०१ जोडप्यांना दिल्या शुभेच्छा

बोईसर: शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याला यंदा उपमुख्यमंत्री Eknath Shinde प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे नववधू-वरांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावर्षी तब्बल २०१ आदिवासी जोडप्यांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व नवरी-नवरदेवांनी सुख, समाधान आणि आनंदाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी, हीच माझी शुभेच्छा आहे. मला प्रत्यक्ष उपस्थित राहून तुम्हा सर्वांना भेटायचे होते, मात्र काही कारणास्तव नियोजित दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे मी व्हिडीओ कॉलद्वारे तुमच्याशी संवाद साधत आहे.”

“मंडपातील सर्व नववधू या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे हा माझ्या घरातीलच विवाह सोहळा आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक आणि आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश धोडी, सहसंपर्क प्रमुख वैभव संखे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन करणे हे शिवसेनेच्या संस्कारात असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, “लग्नासाठी अनेक गरीब कुटुंबांना कर्ज काढावे लागते, जमीन गहाण ठेवावी लागते. अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळा ही मोठी मदत ठरते. या सोहळ्यात जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देऊन कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचे लग्न लावून दिले जाते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले असल्याचे नमूद करत, “हा सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे त्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. हा केवळ विवाह सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचे मोठे उदाहरण आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. २०२३ मध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आदिवासी कन्यादान योजनेतील निधी १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. त्या निर्णयाचा लाभ अनेक आदिवासी महिलांना होत असल्याचे धोडी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत