मुंबई: नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे.
शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार, उसळलेला जनसागर आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यांतलं दुःख—या साऱ्यांतून दादांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र, राजकीय वलयाच्या पलीकडे अजित पवार यांचा एक वेगळाच, खासगी आणि माणुसकीचा कोपरा होता. त्या कोपऱ्यात ते फक्त ‘अजित’ असायचे. तो कोपरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं घर आणि त्यांची घट्ट मैत्री.
दोन स्पष्टवक्ते, एक घट्ट मैत्री
अजित पवार आणि नाना पाटेकर—दिसायला दोन भिन्न विश्वं. पण दोघांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि कामावरील प्रचंड निष्ठा. नानांना दादांचा कामाचा उरक आणि निर्णयक्षमता आवडायची, तर दादांना नानांचं समाजकार्य, साधेपणा आणि प्रामाणिकपणा भावायचा.राजकीय धावपळीतून थकले की दादा अनेकदा नानांच्या फार्महाऊसवर जाऊन विसावायचे. तिथे कुठलाही प्रोटोकॉल नसायचा—फक्त साधं जेवण, मोकळ्या गप्पा आणि मनापासूनचं हसणं असायचं.
जेव्हा नानांनी भर सभेत घेतली दादांची फिरकी
दादांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिला जात आहे. यात २०१६ सालचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय. एका सार्वजनिक कार्यक्रमात नाना पाटेकर भाषण करत होते आणि शेजारी बसलेले अजित पवार आपल्याच विचारांत हरवलेले दिसत होते.नानांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी भर सभेतच दादांची मिश्किल फिरकी घेतली.
नाना म्हणाले,“अजित, तुझं लक्ष दुसरीकडे आहे. मी फार महत्त्वाचं बोलतोय. कोण आहे मनामध्ये? सांग खरं… असा हरवल्यासारखा का झालास?”या गुगलीवर अजित पवार क्षणभर गडबडले आणि चक्क लाजले. नाना पुढे म्हणाले,“अजितच्या गालावरची लाली मी पहिल्यांदाच पाहतोय. छान! तू लाजलेलाही मला फार आवडतोस.”नानांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला. पण आज तोच व्हिडिओ पाहताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.
मल्हार पाटेकरची भावूक पोस्ट
नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी दादांच्या निधनानंतर काही दुर्मिळ आणि खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अजित पवार नानांच्या निसर्गरम्य ठिकाणी निवांत क्षण घालवताना दिसतात.
मल्हारने लिहिलं आहे
“माननीय अजित दादा पवार साहेबांचे जाणे हे आमच्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. ते आमच्या कुटुंबाचाच एक भाग होते आणि कायम राहतील. त्यांच्या सोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी आज मनाला चटका लावून जात आहेत. ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे.”आज अजित पवार राजकीय मंचावर नसले, तरी अशा आठवणींमधून ते कायम जिवंत राहणार आहेत. माणूस म्हणून, मित्र म्हणून आणि एका संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून.