हिम्मत असेल तर लोकसभा लढा; डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे गणेश नाईक यांना थेट आव्हान

महाराष्ट्र

अंबरनाथ: ठाणे-कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची तलवार उपसली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नाईक यांना खुले आव्हान दिले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. जनतेने त्यांना अनेक वेळा माजी केलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. वयोमानानुसार त्यांना स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत.”

यावेळी त्यांनी थेट आव्हान देत म्हटले, “जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत कल्याण, ठाणे किंवा हवे त्या मतदारसंघातून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी. मैदानात या आणि जनतेचा कौल घ्या.”या वक्तव्यानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-नाईक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.