विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

महाराष्ट्र

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडवणारी असावी, असे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

भारत हा विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेला देश असून, या विविधतेचे सामर्थ्यात रूपांतर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, डेटा सायन्स, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे रोजगाराचे स्वरूप वेगाने बदलत असल्याने पारंपरिक पाठांतरावर आधारित शिक्षण अपुरे ठरत आहे. त्यामुळे ज्ञानासोबत कौशल्य, नवकल्पना, संशोधनाची वृत्ती आणि जागतिक दृष्टी विकसित करणारी शिक्षणव्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देतानाच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडली. तसेच संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, मानसिक आरोग्य, लिंगसमता आणि नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रुजविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शालेय स्तरापासून कौशल्याधारित शिक्षण, इंटर्नशिप, उद्योगभेटी, आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल कौशल्यांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशीही त्यांनी मागणी केली. तंत्रज्ञान हे शिक्षकांचा पर्याय नसून अध्यापन अधिक प्रभावी करणारे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण, संशोधनाच्या संधी आणि निर्णय प्रक्रियेत अधिक भूमिका देणे, ग्रामीण-शहरी दरी कमी करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण, इंटरनेट, प्रयोगशाळा आणि ग्रंथालये पोहोचविणे, तसेच विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ लेखी परीक्षेवर न होता प्रकल्प, सादरीकरण, संशोधन, सामाजिक सहभाग, नेतृत्वगुण आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या आधारेही व्हावे, असेही त्यांनी सुचविले.

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील युवा लोकसंख्या असून, या तरुणाईला योग्य दिशा देणारे शिक्षण हेच विकसित भारताचे सर्वात मोठे भांडवल ठरेल. विचारांनी समृद्ध, कौशल्यांनी सक्षम, मूल्यांनी संपन्न आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारा भारतीय नागरिक घडविणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, असे दिनेश शिंदे यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत