जगाचे नेतृत्व बदलले, पण भारताचे परराष्ट्र धोरण जुन्याच चौकटीत; प्रविण साहनींची मोदी सरकारवर टीका

महाराष्ट्र

अमेरिका–इराण युद्धानंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा; महाराष्ट्र काँग्रेसच्या चर्चासत्रात परराष्ट्र धोरणावर सखोल चर्चा

मुंबई: अमेरिका–इराण युद्धानंतर जगातील शक्ती-संतुलनात मोठा बदल झाला असून जग आता द्विध्रुवीय नसून बहुध्रुवीय बनले आहे. मात्र, भारताने बदलती जागतिक समीकरणे ओळखण्यात अपयश आल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असा दावा संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “अमेरिका–इराण युद्ध व भारतावर होणारे परिणाम” या विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला उपस्थित होते.

साहनी म्हणाले की, अमेरिका महायुद्ध आणि शीतयुद्ध जिंकली असली तरी २०१३ नंतर जगाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रशिया, चीनसह इतर देशही प्रभावी शक्ती म्हणून उदयास आले असून पाकिस्तानचेही जागतिक महत्त्व वाढले आहे. अशा परिस्थितीत भारताने वास्तव स्वीकारून परराष्ट्र धोरणात बदल करणे आवश्यक आहे.

अमेरिका–इराण संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत साहनी यांनी सांगितले की, रशिया आणि चीनच्या मदतीमुळे इराणची लष्करी क्षमता अधिक मजबूत झाली आहे. हार्मूज सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण हे जागतिक व्यापार, तेल वाहतूक आणि इंटरनेट नेटवर्कच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी म्हटले की, अमेरिका, रशिया आणि चीन या तिन्ही महासत्तांशी पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत. मात्र, भारताने बदलती परिस्थिती समजून घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागू शकतात.

समारोपात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता तंत्रज्ञानाधारित झाले असून “युद्ध नव्हे, बुद्ध” हीच भारताची भूमिका असली पाहिजे. २०१४ नंतर भारताच्या अनेक पारंपरिक मित्रदेशांशी संबंध कमकुवत झाल्याचा आरोप करत त्यांनी जागतिक घडामोडी समजून घेऊन देशहिताचे धोरण स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत