शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

महाराष्ट्र

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काम केले असेल तरच कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत होते, असे सांगत त्यांनी सरनाईक यांच्या कामाचे कौतुक केले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत २३ ऑक्टोबरला सरनाईक यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अमरावती येथे सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शिंदे बोलत होते. अंबामातेचे दर्शन घेऊन अमरावतीत आल्याचे सांगत त्यांनी उपस्थित मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, महायुतीचे पदाधिकारी आणि शिक्षकांचे स्वागत केले.

सरनाईक यांनी मतदारसंघातील प्रत्येक शाळेला भेट देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, आतापर्यंत केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल आणि भविष्यातील कामांचा कृतीनिश्चय असल्याचे शिंदे म्हणाले.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका

जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न, दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांच्या परीक्षा आणि सेवाशर्तींसंबंधीचे प्रश्न सरकार सकारात्मकतेने सोडवेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकण्याऐवजी त्यांना अध्यापन आणि विद्यार्थी घडविण्यावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अल्पसंख्याक शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित प्रश्नांवरही सरकार काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदतीची ग्वाही

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना शिंदे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतींचा लाभ दिला जाईल, असे सांगितले. “सत्कार करण्याची वेळ नाही, बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे,” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.

महायुती सरकार सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला आणि शिक्षकांसाठी काम करीत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. शिक्षकांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी हक्काचा शिक्षक आमदार आवश्यक असून, त्यासाठी सरनाईक यांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

“दसऱ्याच्या सीमोल्लंघनापूर्वीच तुम्ही आज राजकीय सीमोल्लंघन केले आहे. दिवाळीपूर्वी सरनाईक यांच्या विजयाचे फटाके फोडायचे आहेत,” असे म्हणत निकालाच्या दिवशी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण अमरावतीत उपस्थित राहू, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.

या सभेला आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय कुटे, आमदार किशोरआप्पा पाटील, युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार ॲड. प्रीती रेवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे, शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख सुनील डीके, अमरावती शहरप्रमुख संतोष भदे, सहसंपर्कप्रमुख श्याम देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत