मुंबई: मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण 2 कोटी 80 लाख रुपये निधी वितरित करण्याचा शासन आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे. हा आदेश कक्ष अधिकारी नागेश बामणे यांनी काढला आहे.
महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांतील 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने कायम ठेवला आहे.
या निधीच्या वितरणासाठी पुणे विभागाचे विभागीय आयुक्त यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, तहसीलदार (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, पालखी सोहळा, दिंड्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना पालखी मार्गावरील टोल नाक्यांवर शुल्क आकारले जात असल्याने वारकरी संस्थांवर आर्थिक भार पडत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या कालावधीत अशा सर्व वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर टोलमाफी देण्याची मागणी विविध वारकरी संघटनांसह शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजकल्याण विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही समोर आली आहे.