राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७७ वी सर्वसाधारण बैठक पार पडली.

या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक मंगेश जोशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि कंपनी सचिव वर्षा चव्हाण यांची उपस्थिती होती.

बैठकीत पर्यटन महामंडळाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील पर्यटन विकासाशी संबंधित विविध धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करताना पायाभूत सुविधा बळकट करणे, सेवा गुणवत्ता सुधारणा आणि पर्यटकांसाठी अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

मंत्री देसाई यांनी पर्यटन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश देत कामकाज अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यटन स्थळांचा दर्जा उंचावणे, स्वच्छता, सेवा व्यवस्थापन आणि पर्यटकाभिमुख उपक्रम राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.याशिवाय पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, स्थानिकांचा सहभाग वाढवणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वय वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राज्यातील पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून, पर्यटन वाढीस चालना देणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे नमूद केले.राज्यातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात आवश्यक निर्णयांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत