प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य व सेवापदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र

मुंबई: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पदक’, तर उल्लेखनीय सेवेसाठी विविध विभागांतील ५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अधिकारी व जवानांचा हा गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. विशेषतः वीरता पदक प्राप्त जवानांनी दाखवलेले धैर्य राज्याची मान उंचावणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अधिक बळकट करणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुनश्च अभिनंदन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.