मुंबई, तुझा सरकारवर भरोसा हाय काय?

महाराष्ट्र

मुंबई: मागील सरकारच्या काळात मुंबई, तुझा बीएमसी वर भरोसा नाय काय नाय काय? हे गाण मुंबई तुबल्यावर  प्रसिद्ध झालं आणि मुंबईत पाणी तुंबण्यावरती खूप चर्चा झाली. मुंबईच्या सखल भागात नेहमीच पाणी साठत. समुद्रातून भरतीच्या वेळेला परत येणार पाणी आणि पावसाचं पाणी हे एकत्र होऊन मुंबई जलमय होते हे  सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना हिंदमाता परिसरात तुबणा-या पावसाच्या पाण्यावर  मार्ग काढण्यासाठी भूमिगत टाक्या बांधल्या. त्यामुळे या भागातले साचणारे पाणी प्रश्न मार्गी लागला. पंपिंगची व्यवस्था केली गेली.

अंधेरीच्या मिलन सबवेतही पाणी साठण्याचे  प्रमाण मोठेआहे. मा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले होते की, “मुंबई तुंबली तरअधिकाऱ्यांना नारळ देणार.एका दिवसात 300 मी पाऊस पडला तरी मुंबई थांबणार नाही.” तसेच “मुंबईत पाणी साचलं तर अधिकाऱ्यांना घरी बसावे लागेल. स्वच्छता कामात टक्केवारी चालणार नाही.” असेही बोलले होते. मात्र हेच आमचे मुख्यमंत्री काल मुंबईत पाणी तुबल्याने, त्रस्त मुंबईकरांनी आधार वाटावा असे आश्वासन शब्दात न बोलता म्हणाले की,” पाऊस आला त्याचे स्वागत करा तक्रारी कसल्या करताय. हे उद्गार  अत्यंत अनुचित आणि प्रसंगाचे भान न राखणारे असेच म्हणावे लागेल; कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे! इथे एक एक क्षण कामासाठी महत्त्वाचा असतो !अशावेळी इथल्या महानगरपालिकेने सतत अलर्ट मोडवर असणे गरजेचे आहे, तत्परतेने काम करणे गरजेचे आहे! इथल्या नालेसफाईची पाहणीही नुकतीच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, तसेच भाजपाचे आ एड आशिष शेलार यांनीही नालेसफाईचे काम पाहून नाराजी व्यक्त केली होती, तर पावसाळ्याआधी नालेसफाई होईल असे वारंवार सांगणं महानगरपालिकेकडून होत होतं! त्यातही पाऊस उशीरा आलाय.

मात्र सध्या देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महानगरपालिकेची कामाची जबाबदारी इतकी वाढलेली आहे की त्यांना त्यांच्या मूळ मुख्य कामाकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाही. महानगरपालिकेची कामे कोणती तर पाणी, कचरा रस्ते यांचे नियोजन व व्यवस्थापन करणे! मुंबईतील नागरिकांच्या कराच्या पैशावर याचे नियोजन करणे. मुंबई मनपाकडे  मोठ्या रकमेच्या एफडी आहेत! या एफडीवर वर्तमान सरकारचं लक्ष आहे असा आरोप वारंवार विरोधी पक्षातील लोकांकडून होतोय आणि ते सत्य असल्याचे अलीकडच्या काळात दिसून येते आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची कामे त्यांची जबाबदारी तत्परतेने पाणी साठल्यावर पंपिंग करण्याचे काम, पपं कुठे बंद आहेत ते दुरुस्त आहेत का हे पाहणे मनपाने केलेली दिसत नाही.

मुंबई महानगरपालिकेत सध्या नगरसेवकही नाहीत. त्यामुळे प्रश्न विचारणार कोण? आयुक्त सगळे काम पाहतात आणि त्यावर नियंत्रण मुख्यमंत्र्यांचे आहे.  लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “सरकार आपल्या दारी हा (महाउत्तम) उपक्रम सुरू केला आणि संबंधित मंत्र्यांसह त्या विभागातले विविध विषयांचे अधिकारी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बोलावले गेले. उपस्थित मंत्र्यांचे ढोल ताशे गाजावाजा स्वागत होऊ लागलं, तिकडे प्रदर्शनाचे स्टॉल लागले आणि  अधिकारी तिथे येऊन बसले. प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकही आले, पण हे लोकांशी संबंधित प्रश्न त्यांच्या त्यांच्या कार्यालयात बसून ही माणसं पूर्ण करतात का? हे पाहण्याचं काम ज्यांनी करायला हवं ते करत नसावेत म्हणून का हे “सरकार आपल्या दारी” आले? असा प्रश्न लोक विचारत आहेत.

मुळात हे सरकार आपल्या दारी आणण्याची गरज आत्ताच का भासली? ज्यावेळी महानगरपालिकेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत आणि संपूर्णपणे राज्यसरकारचं वर्चस्व आहे. लोकांचा कराच्या रूपाने साठलेला पैसा कोणत्या कामासाठी वापरतोय हे प्रश्न सर्वसामान्य विचारण्यासाठी वेळ ठेवला नाही! त्याची माहिती काढली असता असं दिसून आलं की, आत्तापर्यंत मुंबई महानगरपालिकेने असे उपक्रम हाती घेतले होते का आणि या उपक्रमामध्ये महिलांना ज्या काही मशिनरी किंवा वस्तू दिल्या जातात त्याची तरतूद महानगरपालिकेच्या नियमांमध्ये आहे का? तर आत्तापर्यंत असं कुठलाही उपक्रम घेतलेला दिसला नाही. मग हे पैसे वापरण्याचा अधिकार किंवा देण्याचा अधिकार आयुक्त आणि फक्त मुख्यमंत्री यांनाच आहे का? असा प्रश्न लोक विचारत आहेत.

कारण “सरकार आपल्या दारी”च्या नावाखाली मनपात, लोकप्रतिनिधी नाहीत, विरोधी पक्ष नाही आणि निवडणुकाही नाही, अशा परिस्थितीत फक्त आपला जनसंपर्क वाढवण्याचे काम ही मंडळी करत आहेत, पैसा खर्च लोकांचा होत आहे. तसाच प्रकार  मुंबई शहरात विविध ठिकाणी केलेल्या जादाच्या रोषणाईचा. इथे एका बाजूला वीज महाग झालेली असताना या रोषणाईची गरज कशासाठी होती? याचा खुलासा होण्याची गरज आहे. आता पावसाळ्यात या  रोशणाईची हालत काय होणार आहे आणि हे जे नुकसान होईल त्याचा भुर्दंड कोणी भरायचा, याची जबाबदारी कोणाची? अशी अनेक अनुत्तरीत प्रश्न ज्यांनी हा उपक्रम सुरू केला त्यांनी देण्याची गरज आहे. मुळात झालंय काय की, मुंबई मनपाकडे असलेले पैसे आपण लोकहितासाठी वापरतोय असं जर मा मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी म्हणत असतील तर या सगळ्या उपक्रमाची आतापर्यंतची नियोजन व्यवस्था आणि त्याचे झालेले फायदे, लाभार्थी याची आकडेवारी त्यांनी लोकांसमोर आणण्याची गरज आहे.

आज मुंबई तुबली, कारण नालेसफाई नीट झालेली नाही, कचऱ्याचे ढीग उचलले गेले नाहीत आणि रस्त्यांची जी काम सुरू आहेत त्याचे सिमेंट आणि डेब्रिजही आहेत, हे सगळं असतानाही मनपाच  लक्ष  अशा महत्त्वाच्या कामावर उरलेलं नाही काय? असा प्रश्न इथे उभा राहतोच. मुंबई महानगरपालिकेला दावणीला बांधून मुंबईकरांचा पैसा जर अशा प्रकारे वापरला जात असेल तर ते विचारण्याचा अधिकार एक मुंबईकर म्हणून आम्हाला आहे. ही सुपीक योजना कोणाच्या डोक्यातून आली आणि मुंबईकरांचे नुकसान का झालं याचं उत्तर मग महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांनी  तातडीने देण्याची गरज आहे.

मुंबईकरांनाच “तक्रारी कसल्या करतय, असे विचारणारे मुख्यमंत्री स्वतःला संवेदनशील म्हणतात मग असे प्रश्न विचारून मुंबईकरांची चेष्टाच करत आहेत असं म्हणण्यास पूर्ण वाव आहे. त्यामुळे हे गाणं पुन्हा डोक्यात आलं “मुंबई तुझा सरकारवर भरोसा नाय काय?”मा मुख्यमंत्री, तुमचं राजकारण का काय ते चालत राहू देत, पण पहिलं लक्ष मुंबईतील जनता, मुंबईची सुरक्षा आणि सुसह्य जीवन यासाठी मनपाचे काम तत्परतेने होण्याची गरज आहे. पाणी तुंबल्यावर त्याची रस्त्यावर उतरून पाहणी करण्याची तशी काहीच गरज नाही. साहेब, फक्त जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपलं काम नेटाने आणि नेमाने केलं पाहिजे इतकीच आमची अपेक्षा. पावसाचाआनंद आम्ही घेऊन पण कृपया तक्रार करण्याचा बोलण्याचा अधिकार अम्हाला आहे हेही लक्षात ठेवा.