दळण आणायला गेला अन् वाटेतच काळाने घाला घातला; कुटुंबाचा एकुलता एक आधार हिरावला

क्राईम महाराष्ट्र

दौंड: राहू (ता.दौंड) येथील राहू – टेळेवाडी रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलर चाकाखाली चिरडल्यामुळे एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल रविवार (ता. २७) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. ओम सोमनाथ ढमढेरे (वय १३) राहणार राहू (ता. दौंड) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. २७) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ओम हा दुचाकीवर राहूच्या दिशेने दळण आणण्यासाठी चालला होता. त्याचवेळी ट्रॅक्टर व ट्रॉली ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस तोडण्यासाठी टेळेवाडीच्या दिशेने शेताकडे चालला होता.यावेळी ओम हा थोरली विहीर परिसरात ट्रॉलीच्या चाकाखाली घसरून गेल्यामुळे अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या ट्रॉली अंगावरून गेल्यामुळे ओमचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

ओम हा दुचाकीवरून राहूच्या दिशेने दळण आणण्यासाठी चालला होता. ट्रॅक्टर ऊस तोडणी कामगार घेऊन शेताकडे निघाला होता. सदर ट्रॅक्टरला तीन ट्रेलर जोडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांनी सांगितले. दौंडच्या पश्चिम पट्ट्यात सर्रास तीन, चार ट्रेलर जोडून उसाची बारमाही अवैद्य धोकादायक पद्धतीने जड वाहतूक चालू असते, असेही त्यांनी म्हटले.

ओम हा पिलाणवाडी येथील कदम पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता सातवीत शिकत होता. त्याच्या जाण्यामुळे परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास राहू येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओम हा एकुलता एक मुलगा होता. दरम्यान, ही घटना घडताच यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अधिकचा तपास यवत पोलीस करत आहेत.

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात सर्रास बारमाही एका ट्रॅक्टरला तीन ते चार ट्रेलर जोडून उसाची जडवाहतूक बारमाही चालू असते. रस्ते खूपच अरुंद आहे . त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे ही धोकादायक वाहतूक आणखीन भविष्यात किती जणांची बळी घेणार..? याबाबत प्रश्न उपस्थित होत असून यवत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.