नवी दिल्ली: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात आर्थिक, सामाजिक व राजकीय अस्थिरता निर्माण होत असून ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या अधिवेशनात तातडीने चर्चा घ्यावी तसेच सर्वपक्षीय बैठक बोलावून परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना ठरवाव्यात, अशी मागणी खासदार Supriya Sule यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढली आहे. ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. हा प्रश्न राजकीय नसून देशापुढे उभे राहिलेले मोठे आव्हान आहे. मात्र, केंद्र सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. देशात इंधनाचा तुटवडा असल्याचे मान्य करण्यास सरकार तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
देश संकटात असताना विरोधक सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र सरकारने वस्तुस्थिती लपवू नये, विरोधकांना विश्वासात घ्यावे. सर्वपक्षीय चर्चेतून या संकटावर उपाय शोधता येतील, असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक परिस्थितीमुळे इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली असताना देशातील शेतकऱ्यांना कायम खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन अमोनियासाठी जाहीर करण्यात आलेली आठ हजार कोटी रुपयांची योजना, नॅनो फर्टीलायझर आणि जैविक शेती प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी नेमकी कितपत झाली, याबाबत त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले.
युद्धग्रस्त देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मात्र सुळे यांनी परराष्ट्रमंत्री Subrahmanyam Jaishankar आणि परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक करून आभार मानले.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी आमदार Rohit Pawar प्रयत्न करत असल्याचे सांगत, त्यांच्या मागणीला देशभरातील विरोधकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सुळे यांनी नमूद केले. आमच्याकडून आरोप-प्रत्यारोप करण्याचा हेतू नाही; आमच्या कुटुंबावर आलेली वेळ इतर कोणावर येऊ नये, एवढीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उमेदवार देणार नसल्याचेही सुळे यांनी सांगितले.