दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप
नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँका, पतसंस्था, विमा कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांना छळून त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले, तर संबंधितांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिंदे यांनी दिला. नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल हरसूल येथे शिवसेनेच्या वतीने १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सक्तीची वसुली खपवून घेणार नाही!
दुष्काळामुळे शेतातील उभी पिके करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावणे सहन केले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्याच्यावर दबाव आणणाऱ्यांची भूमिकाही तपासली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी निराश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या अडचणी शिवसेनेचे कार्यकर्ते, प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
३०५ तालुके दुष्काळग्रस्त; पाच हजारांची तातडीची मदत
राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त असून पात्र शेतकऱ्यांना दुष्काळातील सर्व सवलती आणि लाभ मिळवून दिले जातील, असे शिंदे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही दुष्काळाच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली असून केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक दुष्काळग्रस्त भागात ‘शेतकरी मदत कक्ष’
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक भागात ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले. पीक नुकसानीचे पंचनामे, अर्ज, नुकसानभरपाई, पिण्याचे पाणी, टँकर आणि शासकीय मदत वेळेत मिळते की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
“आता दुसरे काम नको; बांधावर, शेतावर आणि शेतकऱ्यांच्या घरी जा,” असे स्पष्ट निर्देश देत त्यांनी दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा उल्लेख
शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतील सहा हजार रुपयांसोबत राज्य सरकारकडून सहा हजार रुपये देऊन वार्षिक १२ हजार रुपयांची मदत, तसेच लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि एसटी प्रवासात ५० टक्के सवलत अशा निर्णयांचा शिंदे यांनी उल्लेख केला.
याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार मिळणारी मदत वाढवणे, नुकसानभरपाईची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत करणे, सततच्या पावसामुळे तसेच गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देणे, अशा उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.
पाणी, चारा आणि अन्नधान्याचे नियोजन
दुष्काळ दीर्घकाळ टिकण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी, चारा आणि अन्नधान्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. छोट्या-मोठ्या पाणी प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील. गरजू गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासोबत पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचेही नियोजन असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दुष्काळामुळे रखडलेल्या विवाहांसाठी शिवसेनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी २५ हजार सायकलींच्या वाटपाचा उपक्रमही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘जिथे संकट, तिथे शिवसेना’
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून जाणे, गुरे वाहून जाणे आणि घरांची पडझड अशा संकटांचा सामना नागरिकांना करावा लागला होता. त्यावेळी सरकारने मदत केली. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी शिधावाटप करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
“जिथे संकट, तिथे शिवसेना” या भूमिकेतून पूर, महापूर किंवा दुष्काळ अशा कोणत्याही संकटात शिवसैनिकांनी मदतीसाठी धावून जावे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित कार्यकर्त्यांनी ८० टक्के समाजकारणाचे धोरण आता १०० टक्के समाजकारणातून प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
वाहन पोहोचू शकत नसलेल्या दुर्गम गावांमध्येही मदत पोहोचवावी आणि पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीला यावे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री दादाजी भुसे, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, माजी आमदार निर्मला गावित, धनराज महाले, बाळासाहेब लांबे, अनिल डिकले, सदा नवले, रविंद्र भोळे, नैना गावित यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.