उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा
नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी, चारा आणि टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, दुष्काळाच्या काळात सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्याचवेळी आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांच्या सुविधांचे नियोजनही युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांना दिलासा, कुंभमेळ्याची तयारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विरोधकांच्या आरोपांवर भूमिका मांडली.
दुष्काळावर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन
नाशिकसह राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि टँकरची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंतची संभाव्य गरज लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. धरणांच्या आजूबाजूच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन केले जात असून, ज्या भागांत टँकरची आवश्यकता आहे, तेथील माहिती संकलित करून त्यानुसार व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, अतिरिक्त मदतीची गरज भासल्यास शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. आवश्यक निर्णय घेण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून प्रशासनाला मुभा देण्यात आली आहे.
सक्तीची कर्जवसुली केल्यास कठोर कारवाई
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा केली आहे. याशिवाय दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बँका, मायक्रो फायनान्स संस्था किंवा अन्य कोणाकडूनही शेतकऱ्यांची सक्तीने वसुली केली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना अधिक अडचणीत आणणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिला.
दिंडोरी, नाशिकच्या दुष्काळी उपाययोजनांसाठी प्रस्ताव
दिंडोरी आणि नाशिक या दोन तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून संबंधित विभागानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध सवलती आणि लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मदतीचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; भाविकांच्या सुविधांवर भर
दुष्काळ निवारणासोबतच नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. कुंभमेळ्याशी संबंधित विविध विकासकामे सुरू असून, संबंधित मंत्री स्वतः या कामांवर लक्ष ठेवून आहेत. सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन केले जात आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण आयोजन सुरळीत पार पडावे, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यातील ५१७ शंखनादांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचा उल्लेख करत हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदींवरील आरोपांवरून विरोधकांना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार आरोप करणाऱ्या विरोधकांनाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी आणि देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोदी काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्यावर आरोप करण्याची सवय विरोधकांनी सोडावी, असे ते म्हणाले.
२०१४ पूर्वीच्या काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळातील बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले आणि कथित घोटाळ्यांचा संदर्भ देत शिंदे यांनी मोदी सरकारच्या दहशतवादविरोधी भूमिकेचे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या कारवाईचा उल्लेख करत देशाच्या जवानांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संकटाच्या काळात सामाजिक संस्थांनीही पुढे यावे
दुष्काळाचे संकट मोठे असून, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार कोणत्याही परिस्थितीत हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. मात्र, या संकटाचा सामना करण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, आमदार सुहास कांदे, गोकुळ गीते, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त आशिष सिंह, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.