मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅस संदर्भातील स्पष्ट धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
गॅस दरवाढ व गॅस टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, संदीप पाटील, प्रकाश सोनावणे, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश कहांडाळ, नाशिक दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत टाकेकर, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, देशातून गॅस सिलेंडर गायब आहे आणि संसदेतून पंतप्रधानही गायब आहेत. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने छोटे व्यवसाय, हॉटेल्स आणि खाणावळी बंद करण्याची वेळ येत आहे. राज्यातील महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेतून १५०० रुपये देण्याचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे महागाई वाढवून महिलांचीच लूट करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी सपकाळ यांनी गॅस वितरकाच्या कार्यालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून गॅस टंचाईबाबत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. वाढत्या दरांमुळे जगणे महाग झाले असून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी नाराजी महिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, नागपूर, पुणे, ठाणे, वर्धा, बुलढाणा, गोंदिया (तिरोडा), पालघर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, धाराशिव, चंद्रपूर (राजुरा) तसेच पनवेलसह राज्यातील विविध जिल्ह्यांत काँग्रेसने गॅस दरवाढ व टंचाईविरोधात आंदोलन केले.