इराणचा जगाला इशारा; कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याची शक्यता, होर्मुज सामुद्रधुनी बंद

महाराष्ट्र

इराण: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल हल्ले सुरू ठेवले आहेत. या संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या वक्तव्यांवरून अमेरिकेला हे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इस्त्रायलवर दबाव वाढल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठा लष्करी निर्णय घेत दक्षिण कोरियातील THAAD (Terminal High Altitude Area Defense) ही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रणाली आता मध्य पूर्वेत तैनात करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इराणने महत्त्वाची तेल वाहतूक मार्ग असलेली Strait of Hormuz ही सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक होते. त्यामुळे अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

वृत्तसंस्था Reuters च्या अहवालानुसार इराणच्या Khatam al‑Anbiya Air Defense Headquarters चे प्रवक्ते Ebrahim Zolfaghari यांनी जगाला इशारा देत म्हटले आहे की, परिस्थिती अशीच राहिली तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.

जर कच्च्या तेलाच्या किमती इतक्या वाढल्या, तर जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडण्याची शक्यता असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. इराणच्या या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठ आणि अनेक देशांच्या सरकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.