एमएसएफडीएच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; उच्च शिक्षण क्षेत्राला डिजिटल बळ

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नव्या सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, एमएसएफडीए ही संस्था राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, गुणवत्ता वृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन रुजविण्यात संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएसएफडीए संकेतस्थळ⁠� द्वारे सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. यामुळे संबंधितांना स्वतःची प्रोफाइल तयार करून प्रशिक्षणासाठी थेट नोंदणी करता येणार असून, वेळापत्रक, अभ्यासक्रम, सूचना आणि शैक्षणिक संसाधने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींसाठी डिजिटल प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार करून प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्या समन्वयातून अधिक परिणामकारक प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हे संकेतस्थळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, सतत व्यावसायिक विकास, डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासनाला चालना देणारे ठरणार असल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

यापुढे एमएसएफडीएचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी संकेतस्थळाद्वारेच करण्यात येणार असून, राज्यातील सर्व संबंधितांनी याचा सक्रिय वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत